छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याचे आणि दरमहा १० टक्के व्याज देण्याचे आकर्षक आमिष दाखवून गुंतवणूकदारांना १ कोटी २८ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या 'समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनी' घोटाळ्यातील दोन मुख्य आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मिटमिटा भागातील या फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी आरोपी सतत पसार राहिल्याने न्यायालयाकडून ही विशेष उद्घोषणा करण्यात आली आहे.
आरोपी नरेंद्र पवार, संदीप मुळे, प्रफुल कांबळे, शुभांगी पवार, स्वप्नील ठाकरे यांनी मिळून समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवले होते. पुण्यात सेमिनार घेऊन त्यांनी नागरिकांना भुरळ घातली होती. योगेश हिवर्डे व इतर १९ जणांनी मिळून १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपये या कंपनीत गुंतवले होते. मात्र, परतावा
न देता या आरोपींनी पोबारा केला. याप्रकरणी फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यांतर्गत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी संदीप मुळे व प्रफुल कांबळे यांना अटक करण्यासाठी न्यायालयाने वारंट काढले होते. मात्र, दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन जाणीवपूर्वक लपून बसले आहेत. त्यामुळे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश- १० यांच्या न्यायालयाने त्यांना आता अधिकृतरीत्या फरार घोषित केले आहे.
हे आहेत फरार आरोपी
संदीप अशोक मुळे (मूळ रा. गोवर्धन, ता. रिसोड, जि. वाशिम, ह. मु. खराडी, पुणे) प्रफुल्ल माणिक कांबळे (मूळ रा. वडगाव रेल्वे स्टेशन, सोनपेठ, जि. परभणी, ह. मु. पुणे), अशी फरार घोषित केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









